Mahavitaran News : नवीन घर बांधले की सर्वप्रथम विजेचे कनेक्शन घ्यावे लागते. वीजेविना अलीकडे जगणे म्हणजे मुश्किल झाले आहे. आता सर्वच ठिकाणी विजेचा वापर होत आहे. घर असो किंवा दुकान सर्व ठिकाणी वीज कनेक्शन लागते. मात्र नवीन विजेचे कनेक्शन घ्यायचे म्हटले की मोठी धावपळ करावी लागते. कागदपत्रांची जमवाजमव करताना नागरिकांची हेळसांड होते.
महावितरणच्या कार्यालयात घरगुती व व्यावसायिक वीज कनेक्शन काढण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. यामुळे नागरिकांना वीज कनेक्शन काढताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आता जर नागरिकांनी घरगुती किंवा व्यावसायिक वीज कनेक्शन काढण्यासाठी अचूक कागदपत्रांसहित अर्ज केला तर त्यांना अवघ्या 24 तासात वीज कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
यामुळे निश्चितच नागरिकांची वीज कनेक्शन काढण्यासाठी होणारी ससेहोलपट यामुळे थांबणार आहे. सोलापूरचे महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांनी याबाबतचे निर्देश निर्गमित केले आहेत. यानुसार आता ग्राहकांनी नवीन वीज कनेक्शन साठी अचूक कागदपत्रांसहित अर्ज सादर केल्यास मात्र 24 तासांच्या आत त्यांना वीज कनेक्शन मिळून जाणार आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांनी ज्या नवीन ग्राहकांना घरगुती किंवा वाणिज्य कनेक्शन घ्यायचे असेल, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह महावितरणकडे अर्ज करावा असे आवाहन केले आहे. अर्ज सादर करताना अचूक कागदपत्रे सादर करावेत असे देखील त्यांनी सांगितले आहे.
तसेच नवीन वीज ग्राहकांनी अर्ज सादर केल्यानंतर शाखा अभियंता कार्यालयाकडून त्यांची पाहणी होईल आणि फक्त २४ तासांत त्या नवीन ग्राहकाला वीज कनेक्शन मिळेल अशी माहिती त्यांनी दिली असून याबाबतचे निर्देष सर्व शाखा अभियंत्यांना त्यांनी निर्गमित केले आहेत. दरम्यान आज आपण नवीन वीज कनेक्शन काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत? आणि यासाठी कुठे ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नवीन कनेक्शनसाठी कोण-कोणती कागदपत्रे लागणार बरं?
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती किंवा व्यावसायिक वीज कनेक्शन मिळवण्यासाठी वीज ग्राहकांना घर जागेचा उतारा किंवा टॅक्स भरलेली पावती, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड, महावितरणचा ए-वन अर्ज ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
अर्ज कुठे करावा लागणार?
घरगुती किंवा व्यावसायिक वीज कनेक्शन काढण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. mahadiscom या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ग्राहकांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. तसेच महावितरणच्या शाखा कार्यालयातही अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहक सुविधा केंद्रात देखील नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करता येणार आहे.