Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील वातावरणात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. तापमाणात मोठी चढ-उतार सुरू आहे. तापमानात चढ-उतार होत असल्याने तसेच राज्यातील विविध भागात ढगाळ हवामान तयार झाले असल्याने महाराष्ट्रात गुलाबी थंडी थोडी कमी झाली आहे.
हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील किमान आणि कमाल तापमान थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे राज्यात अजूनही थंडीची तीव्रता वाढलेली नाही.
हवामान खात्याने मात्र यंदा नोव्हेंबर महिन्यात राज्यातील कमाल आणि किमान तापमान चढेच राहील आणि यामुळे थंडीची तीव्रता थोडीशी कमी भासेल असे या आधीच स्पष्ट केले आहे.
दरम्यान राज्यातील दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाळी वातावरण अनुभवायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान तयार होत आहे तर काही ठिकाणी हलका पाऊसही बरसत असेल.
तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहत असून दिवसा कडक उन्हाचे चटके बसत आहे. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला केव्हा सुरूवात होणार हा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमधील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज या संबंधित पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांसह पाऊस पडणार असा इशारा भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे संबंधित भागातील सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपल्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे.घराबाहेर पडण्याआधी नागरिकांनी हवामान खात्याचा हा अंदाज लक्षात घेऊनच घराबाहेर पडावे असे सांगितले जात आहे.
दरम्यान दक्षिण भारतात अजूनही पावसाचे तांडव सुरूच आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू केरळ यांसारख्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात दिवाळीच्या आठवड्यातही पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असल्याचे मत काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे.