Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण पावसाचा जोर अजूनही कमीच आहे. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. मात्र गेल्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला.
ऑगस्ट महिन्यात तर पाऊस महाराष्ट्रातून गायबच झाला. ऑगस्ट महिन्यात जवळपास सुरुवातीचा पहिला पंधरवडा कोरडा गेला. दुसऱ्या पंधरवड्यात जोरदार पावसाचा अंदाज होता मात्र पावसाचा जोर काय वाढला नाही. आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
राज्यातील कोकण मुंबई आणि विदर्भातील काही भागात रिमझिम सऱ्या बरसत आहेत. यामुळे खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवनदान मिळेल असे सांगितले जात असले तरी देखील प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज आहे. या चालू महिन्यात अद्याप महाराष्ट्रात मोठा पाऊस मात्र पडलेला नाही.
यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजूनही मिटलेली नाही. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. परंतु शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आहेत.
दरम्यान जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी येत्या 48 तासात राज्यातील कोकण विभागातील उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर तसेच दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि रायगड या चार जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज बांधला आहे.
तसेच विदर्भ भागातील गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तसेच मराठवाड्यातही काही भागात पावसाच्या सऱ्या बरसणार असा अंदाज आहे.
खरतर या विभागात या चालू ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र आता येत्या 24 ऑगस्टपर्यंत मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत.
याशिवाय राज्यातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची नितांत आवश्यकता असून येत्या काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का आणि खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.