Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. या कालावधीत राज्यातील काही भागात गारपीट देखील झाली. मात्र 21 मार्चपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे पाहायला मिळत होते.
राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 38 ते 40 अंश सेल्शियस पर्यंत पोहोचला आहे. विशेष बाब अशी की, काही ठिकाणी 40°c पेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद केली जात आहे. यावरून उन्हाची तीव्रता आपल्याला लक्षात येत असेल.
तसेच, आगामी काळात दिवसाच्या कमाल तापमानात आणखी वाढ होणार असा अंदाज आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी लागणार असे म्हटले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 27 मार्च रोजी विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
रिजनल मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण, पुढील २४ तासांत राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
आज राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष सावध राहणे अपेक्षित आहे.
खरे तर, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मान्सूनोत्तर पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान केले. यानंतर नवीन वर्षाची सुरुवातही अवकाळी पावसानेच झाली.
जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला. विशेष म्हणजे अजूनही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. यामुळे यंदाचा पावसाळा कसा राहणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
मात्र अनेक जागतिक हवामान संस्थाने यावर्षी भारतासहित अनेक देशांमध्ये चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला आहे. एलनिनोचा प्रभाव कमी होईल आणि ला लिना सक्रिय होईल असा अंदाज हवामान संस्थांनी दिला असून यामुळे यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज घेण्यात आला आहे.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत भारतात अनेक ठिकाणी सामान्य पेक्षा अधिक पावसाची शक्यता राहणार आहे. निश्चितच, असेच जर घडले तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायी ठरणार आहे.