Maharashtra Viral News : भारताला कृषिप्रधान देशाचा दर्जा मिळालेला आहे. येथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती सोबतच शेतीपूरक व्यवसाय देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. मात्र असे असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला आहे.
यामुळे शेतीपासून आता नवयुवक तरुण दुरावत असल्याचे भयावय चित्र तयार होत आहे. तर दुसरीकडे नेते, बॉलीवूड मधील अभिनेते, क्रिकेटपटू, नामांकित उद्योगपती शेतीमध्ये रुची दाखवत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक व्हीआयपी लोकांनी शेती खरेदी केली आहे.
भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू देखील आता शेती करण्याला विशेष महत्त्व देत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू, क्रिकेट टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे शेती करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो तुम्ही पाहिले असतील.
2011 वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ तर प्रचंड व्हायरल झाला आहे. धोनी आपल्या गावाकडे शेती करत आहे. दरम्यान धोनी पाठोपाठ आता टीम इंडियाचा आणखी एक फॉर्मर कर्णधार फार्मर बनला आहे.
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू, 1983 चे वर्ल्ड कप विजेते संघाचे कर्णधार कपिल देव यांनी महाराष्ट्रात तब्बल 16 एकर शेती विकत घेतली आहे. यामुळे आता कपिल देव देखील शेती करणार असे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कपिल देव यांनी महाराष्ट्रातील कर्जतच्या नेरळ येथे 16 एकर जमीन खरेदी केली आहे. मुंबईच्या बाहेर मोकळ्या वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी त्यांनी ही जमीन खरेदी केली आहे.
पूर्णपणे सेंद्रिय भाजीपाला उत्पादित करता यावा यासाठी आता नेते, अभिनेते, खेळाडू शेती करत आहेत. कपिल देव यांनी देखील याच उद्देशाने नेरळ येथे 16 एकर जमीन खरेदी केली आहे.
कपिल देव नेरळ येथे जमिनीच्या सौद्यासाठी नुकतेच दाखल झाले होते. तालुक्यातील मोग्रज गावाच्या पायथ्याची ही शेतजमीन आहे. ही जमीन तुळशीराम गायकर यांच्या मालकीची होती.
आता या जमिनीचे मालक भारताचे स्टार क्रिकेटपटू कपिल देव बनले आहेत. तुळशीराम गायकर आणि कपिल देव यांच्यामध्ये या जमिनीबाबत व्यवहार झाला आहे. या जमिनीचा व्यवहार नेरळ येथील सहनिबंधक कार्यालय येथे पूर्ण झाला आहे.
येथे प्रभारी सहनिबंधक मंगेश चौधरी यांनी खरेदी विक्रीचा व्यवहार नोंदवून घेतला आहे. म्हणजेच आता कपिल देव अधिकृतरित्या 16 एकर जमिनीचे मालक झाले आहेत. आता या ठिकाणी कपिल देव फार्म हाऊस ची निर्मिती करणार आणि शेती करणार अशा चर्चा सुरू आहेत.