Maharashtra Vande Bharat Train : भारतीय रेल्वेने आता खऱ्या अर्थाने कात टाकायला सुरुवात केली आहे. जेव्हापासून रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन दाखल झाली आहे, तेव्हापासून रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलला आहे.
आता प्रवाशांना जलद गतीने रेल्वे प्रवास करता येणे शक्य झाले आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही कमाल 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम असणारी हाय स्पीड ट्रेन आहे.
शिवाय या गाडीमध्ये असणाऱ्या वर्ल्डक्लास सोयीसुविधा प्रवाशांना विशेष आकर्षित करत आहेत. या गाडीचा वेग आणि यातील फॅसिलिटीज पाहता ही गाडी प्रवाशांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. ही गाडी आतापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली आहे.
यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, मुंबई ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे.
विशेष बाब अशी की, महाराष्ट्राला आणखी नवीन सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार अशी बातमी समोर येत आहे. येत्या आर्थिक वर्षात या सहा नवीन गाड्या सुरू होणार असे म्हटले जात आहे.
यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी सक्षम होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या आहेत.
विशेष म्हणजे या 10 पैकी एक गाडी आपल्या महाराष्ट्राला मिळालेली आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. ही गाडी मुंबई सेंट्रल येथून सुटणार आहे. मुंबई सेंट्रल येथून सुटणारी ही दुसरी गाडी राहणार आहे.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर ही देखील गाडी अहमदाबाद मार्गे धावत आहे. याचाच अर्थ या मार्गावर धावणारी ही दुसरी गाडी राहील. ही गाडी पाचशे किलोमीटरचा प्रवास सहा तासात पूर्ण करेल अशी आशा आहे. यामुळे प्रवाशांना निश्चितच मोठा फायदा मिळणार आहे.
या नवीन मार्गांवर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिंकदराबाद, मुंबई ते कोल्हापूर या मार्गांवर देखील नवीन आर्थिक वर्षात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक वर्ष एक एप्रिल पासून सुरू होणार आहे.
दरम्यान या 2024-25 या नव्याने सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्राला मिळणार असल्याने राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आठ वरून 14 वर पोहोचणार आहे.