Maharashtra Student Free Tablet Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासहित विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शासन कटीबद्ध आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी शेकडो योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अशीच एक कौतुकास्पद योजना राबवली जात आहे.
या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तथा महाज्योती संस्थाकडून JEE / NEET / MHT-CET या प्रवेश परीक्षेसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.
विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि सहा जीबी इंटरनेट उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे याचा तळागाळातील विद्यार्थ्यांना फायदा होत आहे हे विशेष.
व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा नक्कीच मोठा फायदा होत आहे. दरम्यान या योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.
राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून या योजनेसाठी अर्ज मागवले गेले आहेत. तसेच पात्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर यासाठी अर्ज करण्याचे आवाहन संबंधितांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
जे विद्यार्थी मार्च 2024 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि ज्यांनी अकरावी सायन्सला प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
फक्त नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटात येणारे विद्यार्थीचं यासाठी पात्र ठरणार आहेत. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या परसेंटेजनुसार, सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण यानुसार केली जाणार आहे.
यासाठी अर्ज करणारे विद्यार्थी जर शहरी भागात असतील तर त्यांनी दहावीच्या परीक्षेत 70 टक्के आणि ग्रामीण भागातील असतील तर त्यांनी दहावीच्या परीक्षेत 60 टक्के किमान गुण मिळवलेले असणे अपेक्षित आहे. निश्चितच राज्य शासनाच्या या योजनेमुळे बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षेसाठी हे प्रशिक्षण उपयोगाचे ठरणार असून यामुळे प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवता येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे.