Maharashtra ST Bus Service To Ayodhya : भारतासहित संपूर्ण जगातील हिंदू सनातन भाविकांची तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा नुकतीच संपली आहे. 22 जानेवारीला श्रीक्षेत्र अयोध्या येथे रामल्लांची प्राणप्रतिष्ठापना झाली अन राम भक्तांची पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली.
उत्तर प्रदेश मधील श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आणि हे भव्य मंदिर राम भक्तांसाठी खुले झाल्यानंतर येथे भाविकांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते.
श्रीक्षेत्र अयोध्या येथे अवघ्या देशभरातून येणारे भाविक दर्शनासाठी रीघ लावून असतात. आपल्या महाराष्ट्रातूनही हजारो राम भक्त रामरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र अयोध्या येथे गर्दी करतायेत. साताऱ्यातूनही अनेक भाविक श्रीक्षेत्र अयोध्या ला जातात.
येथील बहुतांशी भाविक हे रेल्वेचा पर्याय निवडत होते. मात्र, रेल्वे ठराविक शहरातून जात असल्याने अनेकांना लाभ घेणे शक्य होत नव्हते. दरम्यान सातारामधील भाविकांची हीच अडचण दूर करण्यासाठी एसटी महामंडळ पुढे सरसावले आहे.
एस टी महामंडळाने अयोध्या येथे दर्शनासाठी जाणाऱ्या राम भक्तांसाठी साताराहून विशेष बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतलाय. एस टी महामंडळाने सातारा ते थेट अयोध्या अशी गाडी चालवण्याची घोषणा नुकतीच केली आहे.
दरम्यान आज आपण या विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक नेमके कसे आहे या गाडीसाठी किती भाडे लागणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं आहे वेळापत्रक
एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारा ते अयोध्या ही विशेष गाडी 25 नोव्हेंबरला सोडली जाणार आहे. रामलल्लांच्या दर्शनासोबत शेगाव, काशी, प्रयागराज, अलाहाबाद या ठिकाणी देखील भाविकांना जाता येणार आहे. 25 नोव्हेंबरला सातारा येथून पहिली बस रवाना होणार आहे.
या बसचा पहिला मुक्काम शेगाव येथे राहणार आहे. अर्थातच भाविकांना शेगाव येथे जाऊन दर्शन घेता येणार आहे. शेगाव येथून दुसऱ्या दिवशी ही बस निघाली की थेट अयोध्याला जाईल. सातारा ते अयोध्या हा संपूर्ण प्रवास 48 तासांचा राहील.
तिकीट दर कसे आहेत?
या विशेष बससाठी साडेसात हजार रुपये एवढे भाडे निश्चित करण्यात आले आहे. या विशेष गाडीमध्ये फक्त 45 सीट उपलब्ध आहेत. पहिली बस ही 25 नोव्हेंबरला रवाना होणार असून हे सहा दिवसांचे देवदर्शन असेल.
या प्रवासादरम्यान प्रवाशांना शेगाव, अयोध्या, काशी, प्रयागराज, अलाहाबाद ही ठिकाणे पाहता येणार आहेत. मात्र, बसमधून जाणाऱ्या प्रवाशांनी स्वखर्चाने राहणे, जेवण व नाश्त्याची सोय करायची आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.