Maharashtra Samruddhi Mahamarg : राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. खरेतर, फडणवीस स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरा दरम्यान नवीन प्रवेश नियंत्रित महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला.
या प्रवेश नियंत्रित महामार्गाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले. हा मार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून सध्या या महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून त्यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे बाकी राहिलेले ७६ किलोमीटरचे काम देखील जलद गतीने सुरू असून येत्या काही दिवसांनी हा संपूर्ण महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असल्याची माहिती महायुती सरकारमधील मंत्र्यांनी दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यानंतर 2023 मध्ये या महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला.
यानंतर 2024 मध्ये या महामार्गाचा तिसरा टप्पा म्हणजेच भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला. या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केले.
4 मार्च 2024 ला या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून नागपुर ते इगतपुरी हा प्रवास जलद झाला असून आता नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास सुपरफास्ट होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी या महामार्गाचा शेवटचा टप्पा कधी सुरू होणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा चौथा टप्पा वाहतुकीसाठी कधी सुरू होणार असे विचारले जात होते.
दरम्यान, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. कल्याणजवळील एका उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, ते पूर्ण होताच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.
पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत हा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा संपूर्ण महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होईल असा दावा प्राधिकरणाकडून केला जात आहे.