Maharashtra Ration Card News : राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिंदे सरकारने गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मराठवाडा आणि विदर्भातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल म्हणजेच दारिद्र्यरेषेवरील रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ ऐवजी रेशन खरेदीसाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.
खरंतर आधी मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील संबंधित एपीएल- केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच रेशन मिळत असे.
मात्र मे 2022 मध्ये केंद्र सरकारने यासंबंधीत शेतकऱ्यांना गहू तांदूळ पुरवता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे राज्यातील शिंदे सरकारने या संबंधित शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यांना रेशन खरेदीसाठी पैसे देण्याचे जाहीर केले.
प्रतिव्यक्ती 150 रुपये प्रति महिना याप्रमाणे रेशन खरेदीसाठी पैसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाचा यासंबंधीत 14 जिल्ह्यांमधील आठ लाख रेशन कार्डधारक कुटुंबातील एकूण 32 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळतं आहे.
मात्र शासनाकडून दिली जाणारी ही रक्कम रेशन खरेदीसाठी अपूर्ण पडत असल्याची तक्रार या लाभार्थ्यांच्या माध्यमातून सातत्याने केली जात होती. यामुळे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ झाली पाहिजे अशी मागणी होती.
दरम्यान याचं मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सकारात्मक असा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने या योजनेबाबत नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
आता या संबंधित 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 150 रुपयांना ऐवजी 170 रुपये प्रति महिना एवढी रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच प्रति लाभार्थी वीस रुपयांपर्यंतची रक्कम वाढवण्यात आली आहे.
साहजिकच या निर्णयाचा या संबंधित मराठवाडा आणि विदर्भ विभागातील आत्महत्याग्रस्त एपीएल केसरी रेशन कार्डधारक शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे.
आधी या योजनेमुळे राज्य शासनावर वर्षाकाठी 576 कोटी रुपयांचा भार पडत होता मात्र आता या योजनेचे पैसे वाढवण्यात आले असल्याने शासनावर अतिरिक्त भार पडणार आहे. आता शासन तिजोरीवर 652 कोटी 80 लाख रुपयांचा भार पडणार असल्याचे म्हटले जात आहे.