Maharashtra Rain : राज्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाचा मुक्काम आता आणखी वाढला आहे. हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी नऊ दिवस अर्थातच 25 एप्रिल 2024 पर्यंत लांबला आहे.
25 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज खुळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे मात्र राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील शेतकरी बांधव विविध नैसर्गिक संकटांमुळे बेजार झाले आहेत.
अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ अशा नानाविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे अशा नैसर्गिक संकटांचा सामना करून जर शेतकऱ्यांनी चांगला शेतमाल उत्पादित केला तर त्या मालाला देखील बाजारात भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे.
सुलतानी आणि आसमानी संकटांमुळे शेतकरी राजा पूर्णपणे हतबल झाला आहे. अशातच, आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. अवकाळी पावसाचे सत्र आणखी नऊ दिवस सुरू राहणार असे हवामान शास्त्रज्ञ खुळे यांनी सांगितले आहे.
कोणत्या भागात बरसणार पाऊस ?
हवामान शास्त्रज्ञ खुळे यांनी महाराष्ट्रातील तब्बल 29 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह कोकण विभाग वगळता राज्यातील उर्वरित 29 जिल्ह्यांमध्ये 25 एप्रिल पर्यंत म्हणजेच पुढील नऊ दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे मुंबईसह कोकणात फक्त आज आणि उद्या अवकाळी पावसाच्या वातावरणाची शक्यता राहणार आहे. पण, उत्तर कोकणात आज आणि उद्या उष्णतेची लाट येणार असा अंदाज समोर येत आहे.
याशिवाय, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या दहा जिल्ह्यांमध्ये 18 एप्रिल पर्यंत दिवसा कडक ऊन आणि रात्री प्रचंड उकाडा जाणवू शकतो असा अंदाज माणिकराव खुळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.