Maharashtra Rain : यंदा मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचे संकट पाहायाला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
एकीकडे राज्यातील काही भागांमध्ये उन्हाचा, तापमानाचा पारा वाढत आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात अजूनही अवकाळीचे संकट कायम असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड मात्र वाढलेली आहे. मध्यंतरी महाराष्ट्रात अवकाळी पावसासोबतच गारपीट देखील झाली. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांसमवेतच फळबाग पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान आजही महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवकाळी पावसाचे संकट केव्हा दूर होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे.
अशातच आयएमडीने अर्थातच भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतीय हवामान विभागाचा नवीनतम हवामान अंदाज.
काय म्हणतंय हवामान विभाग
आगामी 24 तास महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट होणार असाही अंदाज देण्यात आला आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच सहा मार्च रोजी ईशान्येकडील राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.
तसेच पूर्व आणि ईशान्य भारतात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असा दावा देखील हवामान खात्याने केला आहे. शिवाय, आज आणि उद्या पश्चिम हिमालयीन प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी पाहायला मिळेल.
या भागात आज आणि उद्या रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दिवसभर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे.
आपल्या महाराष्ट्रात आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.