Maharashtra Rain : सूर्यदेव महाराष्ट्रावर चांगलेच कोपले आहेत. अनेक ठिकाणी सूर्य जणू आग ओकत आहे. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे, उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यात उष्माघाताची देखील प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
यामुळे या प्रचंड उकाड्यात नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. खूपच आवश्यकता असेल तेव्हाच दुपारी घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबावे, कष्टाची कामे करणाऱ्या मजुरांनी तथा शेतकरी बांधवांनी देखील उन्हापासून स्वतःच संरक्षण करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
मात्र अशी परिस्थिती असतानाच राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ओडिशापासून छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.
याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार झाले असून वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. शिवाय उन्हाच्या झळा देखील वाढल्या आहेत.
दरम्यान, आता आपण हवामान खात्याने आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे, कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार आहे ? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस अन कुठं होणार गारपीट ?
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, आज राज्यातील विदर्भ विभागातील चार जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाडा विभागातील दोन जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसासह गारपीटीची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या चारी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाचा गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र या दोन्ही जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या 14 जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.