Maharashtra Rain : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्रात प्रत्येक महिन्याला वादळी पाऊस होत आहे.
नोव्हेंबर 2023 पासून ते एप्रिल 2024 या काळात प्रत्येक महिन्याला सुरुवातीला किंवा शेवटी वादळी पावसाची हजेरी लागली आहे. गेल्या महिन्यात देखील वादळी पाऊस झाला होता. गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान चालू मे महिन्यात देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. काल राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
विशेष म्हणजे आज राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, दक्षिण कर्नाटकमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याचे पाहायला मिळतं आहे.
तसेच, पूर्व मध्य प्रदेशपासून, विदर्भ, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी गारपीट होत आहे.
आज देखील राज्यात काही ठिकाणी गारपीट होणार असा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर सहित एकूण दहा जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागात आज तुरळक ठिकाणी गारपीट होईल, असे आय एम डी ने आपल्या अंदाजात स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 13 मे 2024 ला राज्यातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीटीची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच नारंगी इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाची शक्यता देण्यात आली आहे. या संबंधित 22 जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट म्हणजेच पिवळा इशारा जारी केला आहे.