Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी प्रचंड उष्णता तर काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होतेय. महाराष्ट्रात देखील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. तापमान 42 ते 43 अंश सेल्स यांच्या घरात पोहोचले आहे.
काल राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले. ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी तापमान ओसरले. पण, तरीही तापमान चाळीस अंश सेल्शियसच्या आसपास होते.
दुसरीकडे गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वादळी पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी जोरदार गारपीट देखील होत आहे.
अशातच आज हवामान खात्याने राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
पाऊस पडण्याचे कारण काय ?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे.
दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, वरील चक्राकार वारे, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग तयार होत आहेत. ही परिस्थिती वादळी पावसासाठी पोषक ठरत आहे.
याच चक्राकार वाऱ्यांमुळे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा च्या तुलनेत विदर्भात मात्र पावसाचा जोर काहीसा अधिक राहणार असा अंदाज आहे.
पावसाचा जोर विदर्भात सर्वाधिक पाहायला मिळणारा विदर्भातील काही जिल्ह्यातच गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज 23 एप्रिल ला राज्यातील विदर्भ विभागातील नागपूर वर्धा यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने येल्लो अलर्ट देखील दिला आहे.
तसेच आज मध्य महाराष्ट्र विभागातील सोलापूर, मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर, विदर्भ विभागातील वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होणार असा अंदाज आहे.