Maharashtra Rain : गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून राज्यात वादळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला असून अगदी पावसाळ्यासारखा फिल येत आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात अवकाळी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी खूपच मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली आहे. अशातच, भारतीय हवामान खात्याने आणखी काही दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज देखील राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली .आहे
दुसरीकडे कमाल तापमानात आज चढ-उतार होणार असा देखील अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
तसेच या चक्राकार वाऱ्यांमुळे आपल्या महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा पाहायला मिळत आहे. या स्थितीमुळे मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. शिवाय रायलसीमा आणि उत्तर तमिळनाडूमध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.
म्हणून आपले शेजारील राज्य छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. विशेष पूर्वमध्य अरबी समुद्रात सुद्धा चक्राकार वारे वाहत आहेत. हेच कारण आहे की सध्या महाराष्ट्रात पूर्व मौसमी पाऊस सुरू आहे.
तसेच मान्सूनसाठी देखील पोषक परिस्थिती तयार होत आहे. राज्यात आज देखील पूर्व मौसमी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आय एम डी ने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने आज अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच आज, 18 मे ला राज्यातील मराठवाडा विभागातील बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर आज विदर्भ विभागातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
म्हणजे आज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळे सदर विभागातील उकाड्याने हैरान जनतेला या वादळी पावसामुळे दिलासा मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील नुकसान होऊ शकते.
तसेच आज या भागात जोरदार वारे देखील वाहण्याची शक्यता असल्याने पिकांचे पशुधनाचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.