Maharashtra Rain : गेल्या आठवड्याभरापासून विदर्भ, मराठवाडा खानदेशसह उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
ऐन उन्हाळ्यात वादळी पाऊस झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, हा वादळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, हळद, कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
फळबाग पिकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक या वादळी पावसामुळे हातातून गेले आहे, यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
दरम्यान आज अर्थातच 14 एप्रिलला देखील महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे.
मात्र आजही अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने यंदा महामानवाची जयंती भर पावसातच साजरी करावी लागणार असे चित्र तयार होत आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे, उत्तर गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तसेच त्यापासून उत्तर ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सुद्धा सक्रिय असल्याचे पाहायला मिळतं आहे.
कोमोरीन भागातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून केरळ, कर्नाटक, कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
दरम्यान, याच हवामान प्रणालीमुळे सध्या महाराष्ट्रात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. आज देखील या हवामान प्रणालीमुळे राज्यातील विदर्भ विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाड्यासहित राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तसेच आज विदर्भात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आयएमडीने सांगितल्याप्रमाणे, आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान या संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने येल्लो अलर्ट देखील जारी केला आहे.