Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने नोव्हेंबर महिन्याची सुरुवात देखील पावसाने होणार असा अंदाज दिला आहे.
खरंतर आजपासून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झालीय, पण आजही ऑक्टोबर हिट चा प्रकोप पाहायला मिळतोय. अजूनही उन्हाचा चटका तापदायक ठरत असून उकाड्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी
पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला असून संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पहाटे गारठा जाणवत आहे.
मात्र अजूनही गुलाबी थंडीची चाहूल लागणे बाकी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून गुलाबी थंडीला कधीपासून सुरुवात होणार असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान भारतीय हवामान खात्याने राज्यातील पाऊस गायब झाल्यानंतर थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे.
आज राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दक्षिणेकडील दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय आज मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या अनुषंगाने या सदरील जिल्ह्यांना आज भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.