Maharashtra Rain : राज्यात 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याचे पाहायला मिळाले. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. अचानक वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.
विशेष बाब अशी की अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. कारण की काल अर्थातच 24 मार्च रोजी पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभर लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात तापमान वाढलेले होते. अनेक ठिकाणी तापमानाने 39 अंश सेल्सिअस चा पारा क्रॉस केला होता. मात्र सायंकाळी सहाच्या दरम्यान तेथील वातावरणात बदल झाला आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक भागात काल पाऊस पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट तयार होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
विशेष म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पाऊस बरसणार अशा बातम्या देखील सध्या व्हायरल होत आहेत. यामुळे, शेतकऱ्यांची काळजाची धडधड आणखी तेज झाली आहे. दरम्यान याच संदर्भात भारतीय हवामान तज्ञांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ते 31 मार्च दरम्यानचे दोन दिवस विशेषतः रंगपंचमी व नाथषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात फक्त ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे.
म्हणजेच 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही असा अंदाज यावेळी खुळे यांनी दिला आहे. परंतु पुढील महिन्यात पावसाची शक्यता जाणवत आहे. गुढीपाडवा झाल्यानंतर दोन दिवसांनी अर्थातच 12 एप्रिल पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे.
तसेच 12 ते 18 एप्रिल पर्यंत पाऊस सुरूच राहणार असा अंदाज आहे. या कालावधीमध्ये राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर अर्थातच संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.
तसेच या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भ विभागात अगदी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पण शेतकरी बांधवांनी चिंता करण्याची काहीही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. कारण की पावसाचा जोर हा खूपच अधिक राहणार असे नाही.
शिवाय पाऊस सुरु होण्याला आणखी बराच काळ शिल्लक आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आपली शेतीची कामे लवकरात लवकर आटोपण्याला प्राधान्य दिले पाहिजे. परंतु पावसाला घाबरून काहीही पॅनिक डिसिजन घेऊ नये असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.