Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पावसाचा मोठा उपद्रव पाहायला मिळतोय. अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ हवामान यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. या चालू मार्च महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. मार्चच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस झाला त्यानंतर काही दिवस महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे कोरडे पाहायला मिळाले.
पण, मार्चच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल झाला आणि 16 मार्चपासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीची हजेरी पाहायला मिळाली.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. पण पावसाचा सर्वाधिक जोर हा पूर्व विदर्भातच पाहायला मिळाला. तेथील काही भागात गारपिटीमुळे अक्षरशः होत्याचे नव्हते झाले.
आता मात्र कालपासून राज्यातील अवकाळी पावसाचे सावट दूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तथापि , शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता राज्यातील हवामान कसे राहणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
त्यामुळे आता आपण आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसाचे ढग आता दूर झाले आहेत.
आता पुन्हा एकदा राज्यात तापमान वाढ पाहायला मिळू शकते. कमाल तापमानात तब्बल दोन ते चार अंशाची अचानक वाढ होईल असे मत आय एम डी कडून वर्तवण्यात आले आहे.
आज अर्थातच 22 मार्च रोजी मात्र महाराष्ट्रातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते. IMD असं म्हणतंय की, पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याचे पाहायला मिळतं आहे.
उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मेघालयापर्यंत हवेचा कमी दाब पट्टा कायम आहे.
याचाच परिणाम म्हणून आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे. तथापि आता तापमाणात वाढ होणार असा अंदाज आहे. विशेष म्हणजे आता अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता नसल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात आजपासून हवामान कोरडे राहणार असा अंदाज दिला आहे. राज्यातील तापमान आजपासून वाढणार असे त्यांनी देखील स्पष्ट केले आहे. तापमान जवळपास 43 ते 44 अंश सेल्शियसपर्यंत पोहोचू शकते असे ते यावेळी म्हटले आहेत.