Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून भारतात उष्ण वारे दाखल होत आहेत. भारतातील गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्र या उष्ण वाऱ्यांमुळे होरपळत आहे. अनेक ठिकाणी या उष्ण वाऱ्यांमुळे दिवसाच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे.
राजस्थानात कमाल तापमान 48 अंश सेल्सिअस पार केले आहे तर आपल्या महाराष्ट्रात कमाल तापमान 45 अंश पार गेले आहे. या उष्ण वाऱ्यांमुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे.
हेच कारण आहे की राज्यातील जनता आता मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन कधी होणार? अशी विचारणा करू लागली आहे. या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील जळगाव आणि अकोला येथे हंगामातील कमाल तापमान म्हणजेच 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात एकीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे काही भागांमध्ये वादळी पावसाचे सत्र सुरूच आहे.
हवामान खात्याने आज देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज जारी केला आहे तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता आहे.
मात्र राजस्थान पासून छत्तीसगड पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पूर्व मोसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून आज राज्यातील पाच जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज खानदेशातील धुळे, जळगाव आणि विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सदर पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला असून या संबंधित 5 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.