Maharashtra Rain : राज्यात एप्रिल महिन्यात जोरदार वादळी पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी गारपीट देखील झाली. या चालू मे महिन्यात देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी पाऊस सुरु आहे. काल राजधानी मुंबईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे अनेक जण जखमी देखील झाले आहेत. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात देखील वादळी पावसाने थैमान घातले आहे.
मध्य महाराष्ट्रातही वादळी पाऊस सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यातील जवळपास 26 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण कर्नाटक आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तसेच वायव्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक पर्यंत चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतं आहे.
या हवामान प्रणालीमुळे राज्यात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. यापूर्वी मौसमी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
विशेष म्हणजे जोरदार वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले आहेत. शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान होत आहे. यामुळे आधीच नैसर्गिक संकटाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
कोणत्या जिल्ह्यात पावसाची हजेरी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, विदर्भ विभागातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे उत्तर कोकणात आज उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणजे या भागात उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे आणि वादळी पाऊस देखील बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांना तथा सर्वसामान्य नागरिकांना विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.