Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसासंदर्भात. खरेतर, या नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. जानेवारीत अवकाळी पाऊस बरसला नंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली.
गेल्या तीन महिन्यांच्या काळात अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात मोठी वाढ झाली. सूर्यदेव महाराष्ट्रावर चांगलेच कोपले आहेत.
अशातच गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे. पावसाचे सत्र सुरू झाल्यानंतर विदर्भातील बहुतांशी भागातील तापमान कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तथापि, राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद केले जात आहे.
अवकाळी पाऊस आणि राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांना चांगलेच झोडपले आहे. मध्य महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस पाहायला मिळाला आहे.विदर्भ अन मराठवाड्यात तर काही भागात गारपीट झाली आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार दिवस अर्थात सोमवार पर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम ठेवली आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कधी पाऊस बरसणार हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार हवामान
आज 12 एप्रिल राज्यातील विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच, आज या सदर जिल्ह्यांमध्ये ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
तसेच, उर्वरित विदर्भ, मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये, खानदेशमधील जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय आज राज्यातील मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरीची हजेरी लागणार असा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच उद्या अर्थातच 13 एप्रिलला संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. 14 एप्रिलला मात्र पावसाचा जोर कमी होईल पण या दिवशी सुद्धा पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच 15 एप्रिलला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज IMD ने दिला आहे. एकंदरीत अवकाळी पावसाचे सत्र सोमवारपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस बरसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.