Maharashtra Rain : गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. मध्यंतरी जवळपास दहा दिवसांसाठी पावसाने सुट्टी घेतली होती. कुठेच चांगला पाऊस होत नव्हता. यामुळे एक-दोन पाऊस झाल्यानंतर लगेचच पेरणी करण्याचा निर्णय घेतलेल्या आणि पेरणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती.
पण, दहा दिवसांच्या सुट्टीनंतर मोसमी पाऊस पुन्हा आला. मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाल्याने मोसमी पावसाला सुरुवात झाली. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी मानसून ने संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला आहे. सर्वदूर मान्सून दाखल झाल्यापासून पावसाचा जोर चांगला वाढला आहे यात शंकाच नाही.
तथापि काही भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. काल देखील राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे. तसेच अनेक ठिकाणी हलका रिमझिम पाऊसही सुरु आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने आज निम्म्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज महाराष्ट्रातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे.
काही ठिकाणी मध्यम ते जोरदार आणि काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज पालघर वगळता संपूर्ण कोकणात पावसाची शक्यता आहे.
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड मध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना आज येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच आज तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. या भागात आज मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असे म्हटले जात आहे.
यामुळे ज्या भागात अजून पेरणी झालेले नसेल तेथील भागात आगामी काळात पेरणीला वेग येणार आहे. तथापि शेतकरी बांधवांनी पेरणी करताना घाई करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. किमान सहा इंच जमिनीत ओल गेल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी यावेळी दिला आहे.