Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल कोल्हापूर जिल्ह्यातील तथा सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपीट देखील झाली आहे.
एवढेच नाही तर सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात अरबी समुद्रातून आद्रता युक्त उष्ण वारे दाखल होत आहेत दुसरीकडे बंगालच्या सागरातून देखील आद्रतायुक्त उष्ण वारे दाखल होत आहेत.
याचा परिणाम म्हणून सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये उकाडा पाहायला मिळत आहे. तसेच यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिला आहे.
आज राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उद्या देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज आयएमडीने जारी केला आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस
हवामान खात्याने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज अर्थातच 18 एप्रिल 2024 ला राज्यातील अहिल्यानगर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
या भागात वीजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसणार असे आयएमडीने म्हटले आहे. शिवाय आज मराठवाडा विभागातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
उद्या कुठं बरसणार पाऊस
IMD ने म्हटल्याप्रमाणे उद्या अर्थातच 19 एप्रिलला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, मराठवाडा विभागातील नांदेड अन विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
एवढेच नाही तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अन मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि खान्देश विभागातील जळगाव जिल्ह्यात सुद्धा हलक्या पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज आहे.
त्यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असली तरी देखील राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता कायम आहे.
यामुळे दिवसा कडक ऊन असताना नागरिकांनी बाहेर जाणे टाळले पाहिजे. खूपच आवश्यक असेल तेव्हाच दुपारी बाहेर निघावे.