Maharashtra Rain : गेल्या महिन्यात अर्थातच एप्रिल महिन्यात राज्याच्या काही भागात वादळी पाऊस आणि गारपीट झाली होती. राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये गेल्या महिन्यात वादळी पावसाचे थैमान पाहायाला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे बातमी समोर आली आहे.
खरेतर, काही भागात कालपासून ढगाळ हवामान तयार झाले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी हलका पाऊस देखील झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पुन्हा नुकसान होणार अशी भीती व्यक्त होत आहे.
सध्या स्थितीला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये खरीप हंगामातील पिक पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची शेती शिवारात लगबग पाहायला मिळत आहे. तसेच बी बियाण्यांच्या खरेदीला वेग आला आहे.
भांडवल उभे करून शेतकरी लवकरच खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात करणार आहे. दरम्यान, कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत. हवामान विभागाने आज देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज महाराष्ट्रातील काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे. पण, राज्यातील काही भागात उन्हाची झळ कायम राहणार आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा आणखी वाढणार असा अंदाज आहे. एकंदरीत राज्यात विषम स्वरूपाच्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असा अंदाज आहे. शिवाय आज आयएमडीने विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि मराठवाडा विभागातील लातूर, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे.
विशेष म्हणजे उद्यापासून अर्थातच आठ मे 2024 पासून पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा विभागातील हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या 17 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.