Maharashtra Rain : महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती बळकट होत असल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मात्र मोठा विपरीत परिणाम होत आहे.
यामुळे रब्बी हंगामातील पिके अक्षरशः कोमेजू लागली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात पोषक हवामान असल्याने पिकांची वाढ चांगली झाली होती मात्र मध्यंतरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला यामुळे पिकांची वाढ खुंटली.
एवढेच नाही तर पिकांवर वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा देखील प्रादुर्भाव झाला. गहू आणि हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळाला.
प्रामुख्याने हरभरा पिक मररोगामुळे पूर्णपणे क्षतीग्रस्त झाले. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती राज्यावर ओढावली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाळी वातावरण तयार होत आहे. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील बरसत आहे. अहमदनगर, बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे.
याशिवाय खानदेश मधील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे इत्यादी भागांमध्ये अगदी तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे.
विशेष म्हणजे राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान खात्याने आगामी तीन दिवस कसं हवामान राहणार याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, आगामी तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. आज 8 जानेवारी 2024 ला राज्यातील खानदेश विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
आयएमडीने खानदेशातील धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी केला आहे. उद्या मात्र राज्यातील खानदेश, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
उद्याला जळगाव, नासिक, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर या जिल्ह्यांसाठी पावसाचा येल्लो लट देण्यात आला आहे. 10 जानेवारीपासून मात्र राज्यातील हवामानात बदल होईल, पुन्हा एकदा हवामान पूर्वपदावर येईल, हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे मत आय एम डी ने व्यक्त केले आहे.