Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनची अरबी समुद्राची शाखा पुन्हा सक्रिय झाली आहे. याचा परिणाम म्हणून आता पावसाचा जोर वाढू लागला आहे. खरंतर गेल्या एका आठवड्यापासून मान्सून एकाच जागेवर मुक्कामाला होता. मात्र आठ दिवस विश्रांती घेतल्यानंतर अखेर मान्सून पुढे सरकला आहे.
मानसून ने राज्यातील खानदेश आणि विदर्भातील काही भागात प्रगती केली आहे. अमरावती पर्यंत असणारी मान्सूनची सीमा आता विदर्भातील गोंदियापर्यंत पाहायला मिळत आहे आणि पावसाचा जोरही वाढला आहे.
काल राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. काल राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा सेक्शन वर मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे.
दरम्यान आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झालीये.
आज अर्थातच 22 जून 2024 ला राज्यातील दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस, तसेच उत्तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, यामुळे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील बुलढाणा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, संपूर्ण खानदेश, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
अर्थातच आज मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. खरे तर घाटमाथा वगळता मध्य महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.
त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत पाहायला मिळत आहेत. पण आता मान्सून सक्रिय झाला असल्याने लवकरच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढेल असे म्हटले जात आहे.