Maharashtra Rain : गेल्या सात ते आठ दिवसांपासून एकाच ठिकाणी मुक्कामाला असणारा मान्सून आता पुढे सरकला आहे. यामुळे महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाल्यानंतर राज्यातील मुंबई सहित अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान खात्याने आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खरे तर मान्सून गेल्या आठवड्यापासून विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या पुढे सरकतच नव्हता. मान्सूनची सीमा अमरावती जिल्ह्यापर्यंतच पाहायाला म्हणत होती. आता मात्र मान्सून पुढे सरकला आहे. काल मान्सूनची सीमा गोंदियापर्यंत आली.
यामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. आज राज्यातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर देखील आज जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे आज कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय, आज मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली तसेच विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
खरंतर राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी एक-दोन पाऊस पडल्यानंतर लगेचच पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गेल्या सात आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमधून पाऊस गायब झाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पण आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान खात्याने आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दुसरीकडे विदर्भातील उत्तरेकडील आणि खानदेशातील ज्या भागाला मान्सूनची प्रतीक्षा आहे तिथे लवकरच मान्सून आगमन होणार असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.