Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी आहे. आज पासून अर्थातच पाच एप्रिल पासून पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे. खरे तर मार्च महिन्याची सांगता वादळी पावसाने झाल्यानंतर आता एप्रिल मध्ये देखील पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आयएमडीने दिलेला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
खरंतर राज्यात तापमानाने 40 ते 42 अंश सेल्सिअस चा पल्ला गाठला आहे. मागील काही दिवसात काही भागात 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी उकाड्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.
अशातच आता हवामान खात्याने पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे. परंतु हा वादळी पाऊस शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान करू शकतो.
रब्बी हंगामातील काढणी केलेले शेती पिक यामुळे वाया जाणार अशी भीती आता व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
5 एप्रिल : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच पाच एप्रिल ला राज्यातील खानदेश विभागातील धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज पासून पावसाला सुरुवात होणार असून पुढील चार दिवस पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
6 एप्रिल : आयएमडीने सांगितल्याप्रमाणे, उद्या अर्थातच 6 एप्रिल 2024 ला राज्यातील संपूर्ण खानदेश विभाग, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड याशिवाय मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांत पाऊस पडणार अशी शक्यता आहे.
या संबंधित जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.
7 एप्रिल : राज्यात रविवारी देखील पावसाची शक्यता आहे. सात एप्रिल ला मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्रातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे सात तारखेला संपूर्ण खानदेश, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली याशिवाय विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
8 एप्रिलला : आठ एप्रिलला राज्यातील विदर्भ विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, अकोला अन मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
याशिवाय संपूर्ण खानदेश म्हणजेच जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सोलापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आयएमडीच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे.