Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. पुन्हा एकदा मोसमी पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसत आहेत. गेल्या महिन्यातही महाराष्ट्रात पावसाचा लंपडावं सुरु होता. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला मात्र उर्वरित महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. गेल्या महिन्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे मात्र अजूनही पावसाचा जोर वाढलेला नाही. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हा सध्या उत्तरेकडे आहे. यामुळे आपल्या महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे.
गेल्या महिन्यात कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरावर चांगला जोरदार पाऊस झाला होता. मात्र गेली दोन दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर देखील पावसाने उसंत घेतली असल्याचे पाहायला मिळतय. काल अर्थातच 3 जुलैला राज्यातील दक्षिण कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र विभागातील कोल्हापूर आणि विदर्भातील गडचिरोलीमध्ये जोरदार पाऊस झाला.
पण उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होता. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या महिन्याप्रमाणेच याही महिन्याची सुरुवात पावसाच्या लपंडावाने झाली आहे.
मात्र हा ऊन, पावसाचा खेळ शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. राज्यात जवळपास खरिपातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत मात्र गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला नसल्याने आणि या चालू महिन्याची सुरुवातही गेल्या महिन्याप्रमाणेच असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज कोकणातील दक्षिणेकडील तिन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकण मधील या सहा जिल्ह्यांना आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील जिल्ह्यांना देखील आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. एकंदरीत मान्सूनचा पहिला महिना उलटला आहे, पण अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र भारतीय हवामान खात्याने नुकताच एक अंदाज वर्तवला होता.
यामध्ये हवामान खात्याने जुलै 2024 मध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये 94 ते 104% म्हणजे सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज आहे.