Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील काही भागात तर अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली आहे. राज्यातील विदर्भ विभागातील बुलढाणा जिल्ह्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे.
यामुळे तेथील शेती पिकांचे आणि चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकतर आधीच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यात सोमवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बसणार असा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
आता आपण भारतीय हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस
भारतीय हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज 5 जानेवारी 2024 ला आणि उद्या राज्यातील जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात सोमवार पर्यंत अवकाळी पाऊस बरसत राहणार असा अंदाज आहे. दुसरीकडे कोकणातील दक्षिण भागातील रायगड अन रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
धुळ्यातही शनिवारी आणि सोमवारी पावसाची शक्यता आहे. IMD ने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुणे जिल्ह्यात शनिवार, रविवारी तसेच कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापर्यंत काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. याशिवाय सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशीव, अमरावती, बीड, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आगामी काही दिवस या संबंधित जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचे आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.