Maharashtra Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राला आणखी एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. बहुप्रतीक्षित बेळगाव-कोल्हापूर (कराड-धारवाड) रेल्वे मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार असल्याची बातमी समोर येत आहे.
यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणाचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे.
या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला संकेश्वरमधून सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रस्तावित रेल्वे मार्ग धारवाड-कित्तूर-बेळगाव कॉरिडॉरचा एक भाग आहे.
हा प्रस्तावित रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर दोन्ही राज्यांसाठी हा रेल्वे मार्ग फायद्याचा ठरणार असून यामुळे या दोन्ही राज्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.
सध्या या प्रस्तावित बेळगाव कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून सर्वेक्षण पूर्ण झाले की या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बेळगाव-धारवाड-कित्तूर रेल्वे मार्गाचे काम आधीच सुरू झाले आहे. तर बेळगाव-कोल्हापूर रेल्वे मार्गाची पायाभरणीही 12 वर्षांपूर्वी झाली आहे. 2012 मध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने 191 किलोमीटर लांबीच्या कराड-बेळगाव मार्गाचे सर्वेक्षण केले होते.
तर नैर्ऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने पाच्छापूर – संकेश्वर -कोल्हापूरसाठी दोन स्वतंत्र सर्वेक्षणे केली होती. अलीकडेच रेल्वे बोर्डाने 160 किमी प्रतिसास वेग क्षमता धारण करु शकणार्या हायस्पीड ब्रॉडगेज मार्गाला मंजुरी दिली आहे.
त्यांतर्गत परकनट्टी-संकेश्वरमार्गे कोल्हापूर विभागासाठी (85 किलोमीटर) प्राथमिक अभियांत्रिकी आणि रहदारी (पीईटी) सर्वेक्षणासाठी 55 लाख मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या रेल्वे मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.
यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा या रेल्वे मार्गामुळे विकसित होईल अशी आशा आहे. हा रेल्वे मार्ग कृषी, उद्योगसहित सर्वच क्षेत्रांसाठी लाभाचा ठरणार आहे.