Maharashtra Railway News : सध्या उन्हाळी सुट्टी, लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम पाहता रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. भारतात नेहमीच प्रवासासाठी रेल्वेला पसंती दाखवली गेली आहे. याचे कारण म्हणजे हा प्रवास खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे सोपे झाले आहे.
मात्र, उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बिहार येथील समस्तीपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे.
या उन्हाळी विशेष गाडीच्या 14 फेऱ्या होणार आहे. यातील सात फेऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते समस्तीपूर अशा होतील आणि सात फेऱ्या समस्तीपुर ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशा होणार आहेत.
यामुळे मुंबईहून बिहारला जाणाऱ्यांना तथा बिहारहून मुंबईला येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तूर्तास आपण या उन्हाळी विशेष गाडीचे वेळापत्रक अन स्टोपेज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एलटीटी-समस्तीपूर ही एक अनारक्षित साप्ताहिक गाडी राहणार आहे. यातील एलटीटी मुंबई-समस्तीपूर अनारक्षित साप्ताहिक स्पेशल गाडी ( गाडी क्रमांक 01039) 22.04.2024 ते 03.06.2024 पर्यंत दर सोमवारी मुंबई येथून 15.45 वाजता सुटणार आहे.
तसेच ही गाडी तिसऱ्या दिवशी 03.30 वाजता समस्तीपूरला पोहोचणार आहे. या कालावधीत ही गाडी सात फेऱ्या मारणार आहे. गाडी क्रमांक 01040 ही अनारक्षित साप्ताहिक स्पेशल गाडी 24 एप्रिल ते 4 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी समस्तीपूर येथून प्रत्येक बुधवारी 06.30 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 16.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
मिळालेल्या माहितीनुसार ही उन्हाळी विशेष गाडी या मार्गावरील ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय, पाटणा आणि बरौनी या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.