Maharashtra Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे अनेकजण आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत. मुंबई, पुणे, नवी मुंबई, पनवेल, ठाणे यांसारख्या महानगरांमध्ये कामानिमित्त शिक्षणानिमित्त स्थायिक जनता आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या मूळ गावाकडे निघाले आहेत. दुसरीकडे, उन्हाळी सुट्ट्या मध्ये अनेकजण पिकनिक साठी पर्यटन स्थळांकडे मार्गस्थ होत आहेत.
याशिवाय सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सध्या रेल्वे मार्गांवर अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, हीच अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत.
विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे मात्र प्रवाशांचा प्रवास सोयीचा झाला आहे. दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाने पनवेल ते नांदेड यादरम्यान देखील उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे पनवेल ते नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण या उन्हाळी विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
सेंट्रल रेल्वेने या उन्हाळी विशेष गाडीचे वेळापत्रक सुद्धा जारी केले आहे. यानुसार, नांदेड-पनवेल उन्हाळी विशेष गाडी 22 एप्रिल ते 26 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून 23:00 वाजता सुटणार आहे आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आहे. तसेच पनवेल-नांदेड उन्हाळी विशेष गाडी 23 एप्रिल ते 27 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 14:30 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
या काळात नांदेड-पनवेल उन्हाळी विशेष गाडीच्या 20 फेऱ्या आणि पनवेल-नांदेड उन्हाळी विशेष गाडीच्या 20 फेऱ्या अशा एकूण 40 फेऱ्या होणार आहेत.
कुठं थांबणार विशेष गाडी
मिळालेल्या माहितीनुसार पनवेल ते नांदेड दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष गाडीला या मार्गावरील कल्याण, इगतपुरी, अंकाई, नगरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळू शकतो. तथापि थांब्याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.