Maharashtra Pre Monsoon Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र अक्षरशा भाजला जात आहे. या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उकाड्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत.
यामुळे मान्सूनचे लवकरात लवकर आगमन व्हावे आणि उखाड्यापासून दिलासा मिळावा अशी इच्छा आहे. दरम्यान मान्सूनची वेगाने वाटचाल सुरू असून तो भारताच्या मुख्य भूमीत 31 मे ला दाखल होईल असा अंदाज आहे.
तसेच दहा जूनच्या सुमारास कोकणासहित मुंबईत मान्सून आगमन होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मात्र महाराष्ट्रावर वरूनराजा मेहरबानं होणार आहे. कारण की राज्यात आजही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काल मान्सूनने श्रीलंका, आग्नेय बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर या भागात चांगली प्रगती केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती आहे.
येत्या २४ तासांत मान्सून आणखी प्रगती करणार आहे. श्रीलंकेचा आणखी काही भाग, आग्नेय बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालचा उपसागर या भागात मानसून आगेकूच करेल असा अंदाज आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात आज सायंकाळपर्यंत चक्रीवादळ तयार होणार असा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून आजपासून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तथापि या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाहीये. याउलट आज राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज आहे. पण काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा विभागातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.
तसेच आज विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये काही भागात वादळी पाऊस आणि काही भागात उष्णतेची लाट येणार असा अंदाज आहे. दुसरीकडे आज राज्यातील खानदेश विभागात देखील उष्णतेची लाट येणार आहे.
विदर्भातील चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यात पुढील तीन-चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज आय एम डी च्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.