Maharashtra New Vande Bharat Train : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. सध्या देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे.
यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राला आतापर्यंत आठ वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली असून लवकरच राज्यातून आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
या संदर्भात कोल्हापूर येथील खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांनी सोमवारी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान कोल्हापूर ते मुंबई दरम्यान लवकरात लवकर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी केली आहे.
खरे तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरला आले होते. त्यावेळी त्यांनी लवकरच कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे म्हटले होते.
माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुंबई ते कोल्हापूर दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती निवडणुकीदरम्यान दिली होती. दरम्यान आता खासदार महाडिक यांनी रेल्वेमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली आहे.
त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. ही ट्रेन सुरु झाल्यास मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास खूपच जलद होणार आहे.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र कोल्हापूर येथे महाराष्ट्रात सहित राज्याबाहेरील भाविकही मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. मुंबईहुन देखील दररोज हजारोंच्या संख्येने भावीक कोल्हापुरात येतात.
कोल्हापूर येथील जनता देखील दररोज शिक्षण, व्यवसाय, नोकरी, पर्यटन अशा विविध कामांसाठी मुंबईला येत असते. अशा परिस्थितीत या मार्गावर जर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर प्रवाशांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे.
यामुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होणार आहे. तथापि, या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डचं घेणार आहे.
मात्र स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे आश्वासन दिले असल्याने मुंबई ते कोल्हापूर दरम्यान नक्कीच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते असे म्हटले जात आहे.