Maharashtra New Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुपरफास्ट झाला आहे. सध्या ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहे. विशेष बाब अशी की यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. अशातच आता राज्यातील प्रवाशांना लवकरच नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक सभेला संबोधित करताना महाराष्ट्राला लवकरच एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार अशी घोषणा केली आहे.
मोदी यांनी नवीन वंदे भारत ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरातून धावणार असे म्हटले आहे. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्स मध्ये कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असा दावा केला जात होता.
दरम्यान याच वृत्ताला पंतप्रधान महोदय यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे नजीकच्या भविष्यात कोल्हापूरला वंदे भारत ट्रेन मिळणार हे स्पष्ट होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणालेत की, ‘मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्ताराचे काम वेगाने सुरू आहे.
शक्तीपीठ द्रुतगती मार्ग पूर्ण झाल्यामुळे राज्यातील मोठ्या भागाला आधुनिक कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आम्ही कोल्हापुरातून नवीन गाड्या सुरू केल्या आहेत. लवकरच वंदे भारत ट्रेनही कोल्हापुरातून धावणार आहे.’
तसेच, पुढे बोलताना पंतप्रधान महोदय यांनी, आम्ही कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गालाही मान्यता दिली असून, त्यामुळे कोल्हापूरहून कोकणात जाणे सोपे होईल, असे म्हटले आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन करताना आपण भाग्यवान आहोत असे पंतप्रधान म्हणाले.
यामुळे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांना आता रस्ते आणि अन्य सुविधांनी कोल्हापुरात ये-जा करता येणार आहे. वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे कोल्हापुरातील उद्योग आणि विकासाला चालना मिळण्यास मदत होईल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई ते कोल्हापूर दरम्यान सुरू होणार वंदे भारत ट्रेन
खरे तर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचे नियोजन आहे.
अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार अशी घोषणा केली असल्याने कोल्हापूरकरांचे वंदे भारतचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. तसेच कोल्हापूरला मिळणारी ही नवीन वंदे महाराष्ट्र मुंबईसाठी सुरु होणार असे बोलले जात आहे.
सध्या महाराष्ट्रातून किती वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे
महाराष्ट्राला आतापर्यंत आठ वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते गोवा आणि इंदूर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.