Maharashtra New Expressway : महाराष्ट्रसहित संपूर्ण देशभरात विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. सध्या स्थितीला राज्यात समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याशिवाय महाराष्ट्रातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी देखील लवकरच भूसंपादनाचे काम सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. शक्तीपीठ महामार्गसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाकरिता भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील पूर्ण झाली आहे.
तसेच कल्याण ते लातूर दरम्यान एक नवीन महामार्ग तयार केला जाणार असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे लवकरच मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. दुसरीकडे संपूर्ण देशभरात विविध महामार्गाची कामे सुरू असून यातील पाच महामार्ग 2024 अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकतात अशी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे यातील दोन मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. दरम्यान, आज आपण याच पाच महामार्गांची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
2024 मध्ये सुरू होणार हे पाच महामार्ग
मुंबई-दिल्ली महामार्ग : मुंबई-दिल्ली द्रूतगती महामार्ग हा भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 1386 किलोमीटर एवढी राहणार आहे. हा देशातील सर्वाधिक लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्लीचा प्रवास वेगवान होणार आहे. सध्या स्थितीला मुंबई ते दिल्ली हा प्रवास करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतोय.
पण जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास फक्त आणि फक्त बारा तासात पूर्ण होऊ शकतो अशी आशा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने दिल्ली दूर राहणार नाही. मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना दिल्लीला जाणे या मार्गामुळे सोयीचे होणार आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच राजस्थानमधील दौसा ते हरियाणातील सोहना हा 209 किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू झाला आहे.
खरेतर हा मार्ग फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत सुरू होणार असे बोलले जात होते. मात्र नियोजित वेळेत हा मार्ग सुरू होऊ शकलेला नाही परंतु डिसेंबर 2024 अखेरपर्यंत हा महामार्ग नक्कीच सुरू होईल अशी आशा आहे. हा मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणारा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
समृद्धी महामार्ग : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यान समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून याचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू झाली आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी असे एकूण तीन टप्पे सुरू झाले आहेत. सुरुवातीला नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.
यानंतर शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. मग भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या चौथ्या टप्प्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून हा टप्पा जुलै 2024 मध्ये सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा प्रवास वेगवान होणार आहे.
बेंगलोर चेन्नई द्रूतगती महामार्ग : हा 262 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. याचे काम 2024 मध्ये पूर्ण होईल अशी आशा आहे. याचा बांधकामासाठी 17000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून यामुळे ही दोन शहरे एकमेकांना कनेक्ट होणार आहेत. या महामार्गामुळे बेंगलोर ते चेन्नई हा प्रवास दोन तासात पूर्ण होणार असे बोलले जात आहे.
दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे : हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विकसित करत आहे. या एक्स्प्रेस वेच्या बांधकामानंतर दिल्ली ते अमृतसर प्रवास जलद होणार आहे. या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास या महामार्गामुळे दिल्ली ते अमृतसर हा प्रवास फक्त चार तासांवर येणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
हा मार्ग 669 किमी लांबीचा राहणार आहे. दिल्ली- अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे या वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित होईल, अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. महामार्गामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा म्हणजे दिल्ली ते कटरा प्रवास फक्त 6 तासांवर येणार आहे.