Maharashtra New Expressway : गेल्या दहा ते बारा वर्षांच्या काळात संपूर्ण देशभरात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे पुर्ण झाली आहेत यात शंकाच नाही. विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत आणि काही महामार्ग प्रकल्पांची कामे आगामी काळात सुरू होण्याची शक्यता आहे.
आपल्या राज्यातही काही महामार्ग प्रकल्पांची कामे आगामी काळात सुरू होणार आहेत. नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तीपीठ महामार्गाचा देखील यामध्ये समावेश होतो. या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. हा प्रकल्प समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे.
याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे. हा प्रकल्प 805 किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करणे हेतू भूसंपादन अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती शासनाने केली आहे.
या प्रकल्पामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास जलद होणार आहे. सध्या या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना 21 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी 11 तासांवर येणार आहे.
हा महामार्ग प्रकल्प महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे हे विशेष. या बारा जिल्ह्यांमधील जवळपास सर्वच महत्त्वाचे तीर्थक्षेत्र या महामार्गामुळे एकमेकांना कनेक्ट होणार आहेत. राज्यात अस्तित्वात असणाऱ्या एकूण साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तिपीठ या महामार्ग प्रकल्पामुळे परस्परांना जोडले जाणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेचे अर्धशक्तीपीठ वगळता उर्वरित तीन शक्तिपीठ या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत. हेच कारण आहे की, या प्रकल्पाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. पण, या महामार्ग प्रकल्पाचा राज्यातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.
आधी फक्त पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात या महामार्गाच्या विरोधात आवाज बुलंद झाला होता मात्र आता मराठवाड्यातही या महामार्ग प्रकल्पा विरोधात आवाज बुलंद केला जात आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या महामार्ग प्रकल्पाचा विरोध केला आहे. नांदेड जिल्ह्यातील बागायती जमिनी या महामार्गामुळे बाधित होणार असल्याने या प्रकल्पाचा विरोध होत आहे.
दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता आता राज्यातील महायुती सरकारच्या या ड्रीम प्रोजेक्टला भाजपाच्या नेत्यांच्या माध्यमातूनही विरोध केला जात आहे. भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांनी या महामार्ग प्रकल्पाचा विरोध केला आहे. या महामार्ग प्रकल्पाचे काम थांबले पाहिजे अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली आहे.
विशेष म्हणजे या संदर्भात भाजपाचे मराठवाड्यातील ताकतवर नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे सरकार समवेत चर्चा देखील करणार आहेत. यामुळे नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण होणार की याचे काम थांबणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.