Maharashtra New Expressway : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात नवनवीन महामार्गाची उभारणी केली जात आहे. आता जे नवीन महामार्ग तयार केले जातात ते सारे प्रवेश नियंत्रित महामार्ग आहेत. म्हणजे अशा महामार्गांवर काही मोजक्याच वाहनांना प्रवेश राहतो आणि प्रवेशासाठी एक्झिट आणि इंट्री साठी पॉईंट असतात ज्याला इंटरचेंज म्हटले जाते.
या अशा महामार्गांमुळे प्रवाशांचा प्रवास जलद होतो. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित झालेला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. समृद्धी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
या महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून त्यावर वाहतूकही सुरू आहे. विशेष म्हणजे उर्वरित 70 किलोमीटर लांबीचे काम ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि त्यावर वाहतूक सुरू होईल असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केला जात आहे.
अशातच आता मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरेतर मुंबई महानगर प्रदेशात अजून एकही प्रवेश नियंत्रित महामार्ग नाहीये. मात्र लवकरच या भागात देखील प्रवेश नियंत्रित महामार्ग तयार होणार आहे.
विरार ते अलिबाग दरम्यान तयार होत असलेला कॉरिडॉर प्रवेश नियंत्रित आहे. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गीकेचे काम एकूण 11 पॅकेज मध्ये पूर्ण होणार आहे. दरम्यान या 11 पॅकेजच्या कामांसाठी नुकत्याच आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत.
या अकरा पॅकेजच्या कामांसाठी सात कंपन्यांनी सर्वात कमी किमतीचे टेंडर दाखल केले आहे. आता राज्य रस्ते विकास महामंडळ या कमी किमतीच्या टेंडरची पडताळणी करणार आहे. जर पडताळणीमध्ये सारे काही योग्य आढळले तर या कंपन्यांना जुन अखेरपर्यंत बांधकामासाठी नियुक्त केले जाणार आहे.
विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गीका 96.5 किलोमीटर लांबीची आहे. हा मार्ग वसई येथील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर येथून सुरू होणार आहे. तसेच, पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावापर्यंत हा मार्ग जाणार आहे.
खरे तर हा मार्ग आठ पदरी राहणार आहे म्हणजेच एका दिशेला चार लेन राहणार आहेत. पण, मुंबई आणि दिल्ली एक्स्प्रेस वेचा काही भाग आणि हा महामार्ग एका ठिकाणी एकत्रित जाणार आहे. या भागात रस्त्यावर प्रत्येकी एका दिशेच्या वाहतुकीसाठी ६ मार्गिका तयार केल्या जाणार आहेत.
म्हणजे सदर भागात हा मार्ग बारापदरी होणार आहे. खरंतर या प्रकल्पाच्या 11 पॅकेजसाठी 29 निविदा दाखल झाल्या होत्या. यातील आर्थिक निविदा मंगळवारी खुल्या झाल्या आहेत. यामध्ये सात कंपन्यांनी सर्वाधिक कमी किमतीच्या निविदा अर्थात टेंडर दाखल केले आहे.
या कंपन्यांचे टेंडर आता व्हेरिफाय केले जाईल आणि यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती होणार आहे. कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील पहिल्या प्रवेश नियंत्रित महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे.