Maharashtra New Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परीयोजनेअंतर्गत देशभरात महामार्गाचे जाळे विकसित केले जात आहे. वास्तविक कोणत्याही विकसित राष्ट्रात तेथील पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका बजावते.
हेच कारण आहे की, शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून देशभरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील रस्ते मजबूत केले जात आहेत. शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवली जात आहे.
भारतमाला परीयोजनाअंतर्गत दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले जाणार आहेत. दरम्यान आता या परियोजनेअंतर्गत केंद्र शासनाने मध्य भारताला दक्षिण पूर्व भागाशी जोडण्यासाठी एका नवीन महामार्गाची घोषणा केली आहे.
नागपूर ते विजयवाडा दरम्यान हा नवीन महामार्ग बांधला जाणार आहे. हा महामार्ग नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातून प्रस्तावित राहणार आहे. हा एक चार पदरी आणि 457 किलोमीटर लांबीचा महामार्ग राहणार असून यासाठी 14,666 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
या इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. या मार्गाचे काम एकूण पाच टप्प्यात विभागले जाणार आहे. तसेच हा महामार्ग पूर्णपणे ग्रीनफिल्ड राहणार नाही.
हा महामार्ग ३१० किलोमीटर लांबीचा ब्राऊनफिल्ड राहील आणि उर्वरित 147 किलोमीटर लांबीचा महामार्ग ग्रीनफिल्ड राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा मार्ग मंचेरियल ते वारंगल दरम्यान ग्रीन फील्ड राहणार आहे. यासाठी तब्बल 2500 कोटी रुपयांचा खर्च होईल. दरम्यान या मार्गाचा डीपीआर तयार झाला असल्याचे वृत्त देखील समोर येत आहे. हा मार्ग तेलंगाना, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांना जोडणार आहे.
काय फायदा होणार?
हा मार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर या तालुक्यातून जाणार आहे. या महामार्गावर चढण्यासाठी किंवा या महामार्गावरून उतरण्यासाठी वरोरा आणि चिमूर तालुक्यातील प्रवाशांकरिता वरोरा – विमूर मार्गावरील सालोरी नजिकच्या खातोडा येथे इंटरचेंज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
विशेष म्हणजे या रस्त्यासाठी वरोरा तालुक्यात ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या मार्गामुळे नागपूर ते विजयवाडा दरम्यानचा प्रवास कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे. सध्या या दोन शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी 12-13 तासांचा कालावधी लागत आहे.
परंतु हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त पाच ते सहा तासात पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे हा चार पदरी महामार्ग 2027 पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे टारगेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेवले आहे.