Maharashtra Metro : महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात आहेत. प्रामुख्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
याचाचं एक भाग म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख महानगरांमध्ये आता मेट्रो धावू लागली आहे. राज्यातील राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या तीन कॅपिटल शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे.
पुण्यात मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. मुंबईमध्ये मेट्रोचे दोन टप्पे सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईमध्ये मेट्रोचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
अशातच आता उपराजधानी नागपूर मध्ये देखील दुसऱ्या टप्प्यात जवळपास 43.80 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्ग तयार होणार अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे.
मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्राच्या उपराजधानीत आतापर्यंत 40 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तयार झाले आहेत.
आता उपराजधानीत मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या शहरात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होणार आहे.
दरम्यान आता आपण नागपूर शहरात टप्पा दोन अंतर्गत कोणकोणते मेट्रो मार्ग तयार केले जाणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणते मेट्रो मार्ग सुरु होणार
केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार उपराजधानी नागपूरमध्ये मेट्रोचा दुसरा टप्पा मिहान ते एमआयडीसीईएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्य नगर ते हिंगणा, प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर असा राहणार आहे.
हे चार मेट्रो मार्ग एकूण ४३.८० किमीचे राहणार आहेत. यासाठी जवळपास ६ हजार ७०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत दिली आहे.
विशेष म्हणजे उपराजधानी नागपूर मधला हा मेट्रोचा दुसरा टप्पा 2027 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर यावर वाहतूक सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.