Maharashtra Longest Highway : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये मोठमोठ्या महामार्गांची निर्मिती झाली आहे. भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीच्या सरकारने देशात रस्त्यांचे मोठे नेटवर्क तयार केले आहे. या नेटवर्कमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा मिळत असून देशाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळाली आहे. देशाची वाहतूक व्यवस्था आता विकसित देशांप्रमाणेच अधिक मजबूत भासू लागली आहे.
देशात अनेक मोठमोठी महामार्ग गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झाले असून असाच एक महामार्ग आपल्या महाराष्ट्रातही तयार होत आहे. हा मार्ग राज्यातील दहा जिल्ह्यांमधून आणि या जिल्ह्यांमधील 390 गावांमधून जातो हे विशेष. हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे हे तर याची विशेषता आहेच सोबतच या महामार्गावर हेलिकॉप्टर उतरवण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
या महामार्गावर हेलिपॅड बनवण्यात आले असून येथे एकाच वेळी चार हेलिकॉप्टर लँड होऊ शकणार आहेत. ही या महामार्गाची एक मोठी खासियत आहे. यामुळे हा महामार्ग फारच चर्चेत आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्रात रोजगारच्या संधी उपलब्ध होणार आहेत तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील विकासाला चालना देणारा ठरेल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण हा महामार्ग प्रकल्प नेमका कसा आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कसा आहे हा महामार्ग?
हा महामार्ग तब्बल 701 किलोमीटर लांबीचा आहे. राज्यातील सर्वाधिक लांबीचा हा महामार्ग राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडतो. या महामार्गाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
विशेष म्हणजे उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा भागही लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. नंतर 2023 मध्ये या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. 2024 मध्ये या महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला.
आता या मार्गाचा चौथा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. हा महामार्ग प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या सात ते आठ तासात पूर्ण होईल असा विश्वास राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाचे 3 टप्पे सुरु होण्याआधी मुंबई ते नागपूर असा प्रवास करण्यासाठी 16 तासांचा वेळ लागायचा. पण, जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होईल म्हणजेच अवघ्या आठ तासात मुंबई ते नागपूर प्रवास करता येणे शक्य होणार आहे. हा मार्ग 9 हजार 900 हेक्टर विकसित केला जात आहे.
हा महामार्ग सध्या सहा लेनचा म्हणजेच सहा पदरी आहे मात्र भविष्यात हा मार्ग 8 लेनचा होणार आहे. हा रोड नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे या मार्गाने हे जिल्हे जोडले जाणार आहेत. तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 14 अतिरिक्त जिल्ह्यांना देखील हा मार्ग सुद्धा जोडला जाणार आहे.
या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तब्बल 11 लाख झाडे लावली जाणार आहेत. या मार्गावर 65 उड्डाणपूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे ओव्हरब्रिज, 25 इंटरचेंज, 6 बोगदे, 189 अंडरपास, हलक्या वाहनांसाठी 110 अंडरपास, 209 अंडरपास असणार आहेत. वन्यजीवांच्या हालचालींसाठी या मार्गावर अंडरपास आणि ओव्हरपास देखील विकसित केले जाणार आहेत.
या महामार्ग प्रकल्पामुळे राज्यातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांना भेटी देणे सोपे होणार आहे. शिर्डी, बीबी का मकबरा, सुला द्राक्ष बाग, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, तानसा वन्यजीव अभयारण्य, पेंच नॅशनल पार्क, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यासारख्या महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांना जाणे या महामार्गाने सोपे होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.