Maharashtra Kanda Market News : आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस. आज दर्श पिठोरी अमावस्या. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळ्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण ग्रामीण भागातील एका अतिशय महत्त्वाचा सण आहे. हा सण खरं तर शेतकऱ्यांचा आहे. या सणाला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजा बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात.
या सणाला बैलांचे पूजन केले जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो. दरम्यान आज बैलपोळ्याच्या मुहूर्तावर राज्यातील बाजारात कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. खरंतर, गेल्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कांद्याला खूपच विक्रमी भाव मिळाला होता.
त्यावेळी कांद्याला घाऊक बाजारात 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा विक्रमी भाव मिळत होता. काही बाजारात याहीपेक्षा अधिक दर नमूद केला जात होता. विशेष म्हणजे त्यावेळी अनेक तज्ञांनी सप्टेंबर महिन्यात कांद्याला कधी नव्हे तो विक्रमी भाव मिळेल असे सांगितले होते. त्यावेळी सप्टेंबर महिन्यात कांदा किरकोळ बाजारात 55 ते 60 रुपये प्रति किलो दरम्यान विकला जाईल असे देखील मत काही तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आले होते.
हेच कारण होते की, केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता गेल्या महिन्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला. शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे कांद्याचा बाजार दबावात आला. कांद्याच्या वाढत्या किमतींवर यामुळे अंकुश लागला. बहुतांशी बाजारात कांद्याच्या किमती कमी झाल्यात.
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कांद्याची निर्यात मंदावली आणि देशांतर्गत साठा वाढला परिणामी बाजार भावात घसरण झाल्याचे तज्ञ लोकांनी नमूद केले आहे. या निर्णयामुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या किमती वाढल्या नाहीत. आज देखील राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला मात्र चारशे रुपये प्रति क्विंटल ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल दरम्यानचा भाव मिळाला. सरासरी बाजार भाव देखील 1200 रुपये प्रति क्विंटल ते 2250 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान नमूद करण्यात आला आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव
आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज 600 क्विंटल कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 2250 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.
कोणत्या बाजारात मिळाला सर्वात कमी भाव
आज पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज लोकल कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल दोन हजार रुपये आणि सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.