Maharashtra Farmer Tractor Loan : महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते. आपल्या राज्यातील जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. यामुळे शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.
राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येचे शेती हे प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे. यामुळे शेती क्षेत्राला उभारी देण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी यांत्रिकीकरणाला चालना दिले जात आहे.
ट्रॅक्टर सारख्या यंत्रांच्या खरेदीवर शासनाकडून अनुदान देखील पुरवले जात आहे. याशिवाय आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देखील पुरवले जाणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज पुरवले जाणार आहे.
खरंतर गेल्या काही महिन्यांपासून या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी दिले जाणारे कर्ज वितरण बंद करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा नव्याने या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज वितरण सुरू झाले आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
खर तर राज्य शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदान योजना देखील राबवली जात आहे. शिवाय मराठा समाजातील बांधवांसाठी या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज पुरवले जात आहे. अण्णासाहेब पाटील मंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला कर्जाच्या व्याजावर 70% ते 80 % व्याज परतावा दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे आणि या कर्जावरील व्याजापैकी 70 ते 80 टक्के व्याज परतावा हा महामंडळाकडून दिला जाणार आहे. निश्चितच, यामुळे मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे सोयीचे होणार आहे.
यामुळे महाराष्ट्रात यांत्रिकीकरणाला चालना मिळणार असून ट्रॅक्टरचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. दरम्यान आता आपण या योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते याविषयी जाणून घेणार आहोत.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेच्या लाभासाठी 1) आधार कार्ड, 2) पॅन कार्ड, 3) रेशन कार्ड, 4) शाळा सोडल्याचा दाखला / जातीचे प्रमाण पत्र, 5) ३ वर्षे उत्पनाचा तहसीलचा दाखला, 6) आधारला लिंक असलेले मोबाइल नंबर, 7) कॅन्सल चेक या कागदपत्रांची गरज भासू शकते.