Maharashtra Farmer Scheme : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. कालपासून या अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे.
यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. खरंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात ज्या ठिकाणी कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते त्या ठिकाणी महायुतीला मोठा फटका बसला असून अनेक खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आणि यामुळे महायुतीमध्ये मंथन सुरू झाले.
विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या तीन महिन्यांचा काळ बाकी राहिला असतानाच महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसल्याने विधानसभा निवडणूक देखील महायुती सरकारला जड जाऊ शकते असे बोलले जाऊ लागले आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला असल्याने आता महायुती सरकारने सर्वसामान्यांना अन शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचीच एक झलक आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाली.
सर्वसामान्य कुटुंबाला एका वर्षात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आज घोषणा करण्यात आली. याशिवाय सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
खरीप हंगाम 2023-24 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयांची मदत देणार अशी घोषणा आज करण्यात आली आहे. ही मदत दोन हेक्टर च्या मर्यादित दिली जाणार आहे.
म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्याने दोन हेक्टर वर सोयाबीन किंवा कापूस लागवड केलेली असेल तर अशा शेतकऱ्याला दहा हजार रुपये मदत मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जबर पराभव पत्करावा लागला असल्याने महायुती सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सदर घोषणा केली असल्याचे बोलले जात आहे. तथापि या घोषणेमुळे महायुती सरकारला काही फायदा होतो की नाही हे तर विधानसभा निवडणुकीचा निकालचं सांगणार आहे.