Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील काजू उत्पादकांसाठी विशेष खास राहणार आहे. खरे तर काजूचे उत्पादन कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरम्यान जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काजू बी दरावरून मोठा गोंधळ पाहायला मिळत होता.
शेतकरी आणि कारखानदार यांच्यामध्ये काजू बी दरावरून वाद सुरू होता. आता मात्र हा वाद निकाली निघाला आहे. कारण की, आता सरकार काजू बी ला अनुदान देणार आहे. यामुळे जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
किती अनुदान मिळणार ?
शिक्षणमंत्री दीपक केसरकर व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत आज अर्थातच 11 एप्रिल 2024 ला शेतकरी व कारखानदार यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत काजू बी ला अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे.
खरेतर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काजू बी साठी स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर १९७ रुपये दर मिळावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीवर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी ठाम राहिलेत.
यामुळे कारखानदार आणि शेतकऱ्यांमधला हा वाद काही मिटत नव्हता. तसेच याबाबत काहीच तडजोड होत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. येथील काजू उत्पादकांनी सरकार विरोधात देखील आक्रमक भूमिका घेतली.
यामुळे सरकारने येथील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि हा तिढा सोडवण्यासाठी मंत्री केसरकर यांनी अखेर पुढाकार घेत यावर तोडगा काढला आहे.
मंत्री केसरकर, कारखानदार आणि काजू उत्पादक शेतकरी यांच्यात झालेल्या आजच्या बैठकीत काजू बी ला दहा रुपये अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच कारखानदार देखील काजू बी ला अतिरिक्त पाच रुपये भाव देणार आहेत.
म्हणजे जिल्ह्यातील कारखानदारांकडून आता येथील काजू उत्पादकांना ११० रुपये दर असलेला काजू बी साठी ११५ रुपये तर ११५ रुपये दर असलेला काजू बी १२० रुपये दराने विकत घेतला जाणार आहे.
अर्थातच आता शासनाचे अनुदान पकडून काजू बी ला 130 रुपये एवढा भाव मिळू शकणार आहे. अनुदानाची रक्कम मात्र आचारसंहितेनंतरच शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे.
दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शासनाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.