Maharashtra Farmer Scheme : शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून विविध बाबींसाठी अनुदान पुरवले जात आहे. विहीर खोदण्यासाठी, शेततळे बनवण्यासाठी देखील अनुदान दिले जाते.
एवढेच नाही तर शेतकऱ्यांना पाईपलाईन साठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईप करिता सुद्धा अनुदान मिळते. खरे तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी पाईपलाईनचे कामे केली जातात. उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांचे शेत रीकामे असते यामुळे उन्हाळ्यात प्रामुख्याने पाईपलाईनची कामे केली जातात.
विशेष म्हणजे या पाईपलाईन साठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईपवर शासनाकडून अनुदान दिले जात आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून एक विशेष योजना राबवली जात आहे. आज आपण याच योजनेचे स्वरूप थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणती आहे ती योजना
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पाईपलाईन साठी आवश्यक असलेल्या पीव्हीसी पाईप वर अनुदान दिले जात आहे.
पीव्हीसी पाईपसाठी अनुदान मिळवणेहेतू पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप साठी अनुदान मिळते.
किती अनुदान मिळते
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 438 मीटर लांबीचे पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. म्हणजेच जवळपास 70 पाईप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. याअंतर्गत कमाल 30 हजार रुपयांचे अनुदान मिळू शकते. शेतकऱ्यांना यापेक्षा जास्तीचे अनुदान मिळत नाही.
कोणाला मिळते अनुदान
या योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही. फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू झाली असून याच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पीव्हीसी पाईप खरेदीसाठी अनुदान मिळते.
ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असते त्यांना याचा लाभ मिळतो. किमान वीस गुंठे आणि कमाल सहा हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्षे याचा लाभ मिळत नाही याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यायची आहे.
अर्ज कुठे करावा लागतो
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईपसाठी अनुदान मिळवायचे असेल तर त्यांना महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. अर्ज सादर झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होते आणि मग पूर्वसंमती दिली जाते.
पूर्वसंमती नंतर शेतकऱ्यांना पाईप खरेदी करावी लागतात. यानंतर आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात आणि मग अनुदानाचा पैसा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.