Maharashtra Expressway : महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासन सामूहिक प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे.
दरम्यान एमएसआरडीसीने हाती घेतलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. खरंतर, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर एवढी आहे. सध्या स्थितीला या महामार्गाचे 600 किलोमीटर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी पर्यंतचे 520 किलोमीटरचे काम पूर्ण झाले. हा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला.
यानंतर या मार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटर चा भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. पहिला आणि दुसरा भाग मिळून एकूण सहाशे किलोमीटरचा मार्ग आत्तापर्यंत सुरू झाला आहे. आणखी 101 km लांबीचा मार्ग सुरु केला जाणार आहे.
हा राहिलेला भाग सुरू झाल्यानंतर संपूर्ण समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पुढील वर्षी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होणार आहे. अशातच मात्र या महामार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे या महामार्ग अंतर्गत केले जाणारे एक अतिशय महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे.
या महामार्गावर असलेला आठ किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा नुकताच तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कासारा आणि नाशिक ते ठाणे हा प्रवास गतिमान होणार असल्याचा दावा केला जात आहे. समृद्धी महामार्गाअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई मार्गाजवळील पिंपरी-सद्रोद्दिन ते शहापूर तालुक्यातील वशाला बुद्रुक (कसारा) दरम्यान 13.1 किलोमीटरचा लांबीचा सहापदरी मार्ग विकसित करण्यात आला आहे.
यामध्ये दोन पूल आणि दुहेरी बोगदा याचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान हा तयार झालेला बोगदा एस आकाराचा आहे. याचे नुकतेच काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे याचे काम वेळेआधीच पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे समृद्धी महामार्गाचे बाकी राहिलेलं काम देखील वेळेआधीच पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
खरंतर नासिक ते ठाणे हा प्रवास यामुळे गतिमान होणार आहे. यामुळे ठाण्याला मात्र पाच ते सात मिनिटात पोहोचता येणार आहे तर इगतपुरी ते कासारा दरम्यान या बोगद्यामुळे अवघ्या दहा मिनिटात प्रवास करता येणार असल्याचा दावा केला जात आहे.